आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणार्‍यांना अटक   

पुणे : कौटुंबिक त्रासाला कंटाळून ८ महिन्यांच्या बाळासह महिला चित्रकूटहून पुण्यात येते आणि ओळखीच्या इसमासोबत नव्याने संसार थाटण्यासाठी होणार्‍या पतीला बोलावते. रेल्वे स्थानकावर गप्पा मारत असताना त्यांची ओळख एका जोडप्यासोबत होते. चौघेही मोलमजुरी करणारेच असल्यामुळे त्यांच्यात गप्पा रंगतात. जेवणाची वेळ झाल्यामुळे ती महिला होणार्‍या पतीला जेवण पार्सल घेऊन येण्यास सांगते. जेवण झाल्यावर आठ महिन्यांचे बाळ अनोखळ्या जोडप्याकडे देऊन दोघेही हात धुवायला जातात. हात धुऊन आल्यावर मात्र, बाळ आणि ते जोडपे गायब असल्याचे दिसते. रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या शेजारीच ही घटना घडते.
 
संबंधित महिला लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन बाळाच्या अपहरणाची तक्रार देले. घटनेच गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर हे रेल्वे स्थानक परिसरातील ७१ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे अपहरणकर्त्याचा शोध घेण्याच्या सूचना देतात. आरोपी जोडपे बाळाला घेऊन रेल्वे स्थानकासमोर असलेल्या रिक्षातून जाताना दिसले. रिक्षाचा शोध घेत असताना नवव्या दिवशी संबंधित रिक्षाचालक स्वतः पोलिसांकडे हजर होतो आणि त्या जोडप्याला स्वारगेट बस थांब्यावर सोडल्याचे सांगतो. अपहरणकर्त्यांनी सातार्‍याकडे जाण्यासाठी बसची विचारणा केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. स्वारगेट बसस्थानकावर जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासतात. मात्र, ते बंद होते.
 
पोलिसांनी याप्रकरणी २७ लाख मोबाइल क्रमांक तपासले आणि डंम्प डेटा आणि सीडीआर डिटेल्स मिळवतात. त्यातूनच, ७ हजार क्रमांक निवडले आणि त्याचा शोध घेतला असता, पोलिसांना त्या पुरुष आरोपीने घातलेले जाकीट चाकण येथील एका सुरक्षारक्षक कंपनीचे असल्याचे समजते. शिरवळ येथून पोलिस चाकणला आले आणि त्यांनी पुन्हा तांत्रिक विश्लेषण केले. स्वारगेट परिसरातील दुकानात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली असता, आरोपी दांपत्य दुसर्‍या रिक्षाने पाषाणला गेल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यावरून पोलिसांनी पाषाण सूस येथे जाऊन बाळाला ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात घेतले.
 
दरम्यान, गरिबीमुळे बाळाच्या आईकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने, पोलिसांचे पथकाने चित्रकूट येथे जाऊन ज्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाला तेथील डॉक्टरांकडून कागदपत्रे आणून, बाळ सुखरूप त्याच्या आईच्या हवाली करतात. अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, आरोपी महिलेला न्यायालयाने जामीन दिला आहे.

Related Articles